मुंबई, दि. 5 ऑगस्ट, चित्रलेखा रासने (प्रतिनिधी) :
सध्या श्रावण महिना सुरू झाल्याने भारतीय सण,उत्सव यांची रेलचेल सुरू झालेली आहे.कोरोनाच्या महा संकटा नंतर सर्वत्र बाजारपेठा आनंदाने खुलेल्या आहेत. महागाईची झळ आहे, तरीपण उत्स्फूर्तपणे आपापल्या परीने आर्थिक नियोजन करून ग्राहक बाजारात खरेदी करीत आहे. बालगोपाळापासून ते थोरामोठ्यांपर्यत सणांचा आनंद लुटत आहे. त्यानिमित्ताने लहान मुलांना देखील आपल्या सणांची माहिती होऊन ते देखील मनापासून सहभागी होत आहे. आता येणारा “मैत्री दिन”असल्याने बाजारात “friendship बँड” किंवा नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन असो अतिशय सूंदर मनाला मोहून टाकणाऱ्या भाऊ बहीण यांच्या पवित्र नात्याला बांधणाऱ्या रेशिम व मोत्याच्या राख्या बाजारपेठेत पाहून मन अगदी भारावून जाते. त्याचप्रमाणे यंदा 15 ऑगस्ट अमृत महोत्सव असल्याने बाजारात प्रत्येक भारतीयांच्या मनात आपल्या देशाविषयी प्रेम ओसंडून वाहत आहे. त्यामुळे बाजारपेठा तिरंगामय झालेल्या आहेत. त्याशिवाय पतेती, पारशी नूतन वर्ष, मोहरम सण देखील येत आहेत. गोपाळकाला व दहीहंडी येत असल्याने विविध प्रकारचे श्री कृष्ण सजावट मुकुट, छोटे छोटे मोहक पाळणे, कपडे, अलंकार त्याचप्रमाणे फळे, लाह्या बत्ताशे खरोखरची व कृत्रीम रंगीबेरंगी फुलांची अति सुंदर बाजारपेठ सजली आहे. तसेच पोळा, गणेशोत्सव येत असल्याने बाजारात विविध प्रकारचे आकर्षक मखर, सजावट साहित्य, पूजेची साहित्य, रोषणाईचे स्टॉल याने दुकाने अगदी सजून गेलेली आहे.

कुंभार वाड्या मध्ये देखील छोट्या मूर्तीपासून ते मोठ्या मूर्तीपासून गणपती बाप्पा ची मूर्ती, हरतालिका, छोटे नाग यांच्याही सूंदर अश्या मूर्ती दिसून येत यांचे आकर्षण सगळ्यांनाच आहे. त्यानिमीत्ताने गरीब, गरजू कामगारांना, कारागिरांना रोजगार उपलब्ध होत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे व यानंतरही येणाऱ्या सणांसाठी देखील बाजारपेठा कायम सजलेल्या असतात…आपल्या संस्कृतीचा वारसा सर्वांनीच जपला पाहिजे सण उत्सव आनंदात, पण शांतपणे साजरे करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
