ठाणे, दि. 8 : विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल वागळे इस्टेट येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राज्य सरकारचा मुंबई विभागस्तरीय उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य श्याम. म. अंबाळकर यांनी दिली.
या संस्थेने 2020-21 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग (व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय) यांच्याकडून मुंबई विभागातून उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील उद्योग क्षेत्रातील विविध कामासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ पुरवठा करणे आणि त्यासाठी युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन सक्षम बनवणे या हेतूने कार्य करणाऱ्या उत्कृष्ट संस्थांना शासन पुरस्कार देत असते.
ठाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने प्रशिक्षणार्थी केंद्रबिंदू मानून मागील तीन वर्षांत 98 टक्के प्रवेश पूर्ण केले आहेत. तसेच निकालाची टक्केवारी 75 टक्के ठेवली आहे. रोजगार व स्वयंरोजगाराच्या जास्तीत जास्त संधी प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. ठाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध 11 व्यवसायाचे अभियांत्रिकी व 02 बिगर अभियांत्रिकी व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते.
मागील तीन वर्षांत या संस्थेत व इतर सार्वजनिक ठिकाणी 285 वृक्षरोपण करण्यात आले आहे. संस्थेत सौर ऊर्जा पॅनेल बसविणे, दूरदृष्य प्रणालीसाठी प्रयोगशाळा, डिमार्ट मार्फत स्मार्ट क्लास रुम, कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण शिबीर, रक्तदान शिबिर, प्रशिक्षणार्थ्यांचा अपघाती विमा काढणे, टपाल कार्यालयामार्फत बँक खाते व आधारकार्ड जोडणी करणे, निवासी श्रम संस्कार शिबीर इत्यादी नाविन्यपूर्ण योजनेची अंमलबजावणी संस्थेने केली आहे. तसेच विविध औद्योगिक आस्थापनांबरोबर प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार केला असून त्यातून या संस्थेचा विकास झालेला आहे.
सुसज्ज कार्यशाळा व सुसज्ज फर्निचर, संस्थेतील शिस्त व स्वच्छता, प्रशिक्षणार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग, औद्योगिक कंपनीत भेटी, ऑन जॉब ट्रेनिंग, संस्थेने केलेली उल्लेखनीय कामे या सर्व कामासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे वागळे या संस्थेला मुंबई विभागातून उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था 2020-21 साठी विभागस्तरीय पुरस्कार मिळाला.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दि.अ.दळवी, आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक कि.वा. खटावकर, संस्था व्यवस्थापन समितीचे चेअरमन एम. व्ही. राव यांनी याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले आहे. संस्थेचे प्राचार्य श्याम म. अंबाळकर, गटनिदेशक एस.सी. तुपकर, प्रमुख लिपिक पी. एस. खोजे. सर्व शिल्पनिदेशक, सर्व कार्यालयीन कर्मचारी यांचे या कार्यात योगदान प्राप्त झाले आहे.
