ठाणे, दि.17 : राज्यातील प्राथमिक शिक्षण पदविका (डीएलएड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश फेरीतील शासकीय कोट्यातील काही जागा शिल्लक असून या जागा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने विशेष फेरीद्वारे भरण्यात येणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावे, असे आवाहन राज्य स्तरीय प्राथमिक शिक्षण पदविका प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समितीने केले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षकरीता प्राथमिक शिक्षण पदविका (D.EL.ED.) प्रथम वर्षांच्या शासकिय कोट्यातील ऑनलाइन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. तथापी अद्याप शासकिय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या जागा विशेष फेरीद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेश देण्यात येणार असून यासाठी सविस्तर सूचना प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
प्रवेशाची शैक्षणिक पात्रता – ईयत्ता १२ वी उत्तीर्ण (खुला संवर्ग ४९.५टक्के व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग ४४.५ टक्के गुणांसह). प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याचा कालावधी दि. १६ ऑगस्ट ते दि. २० ऑगस्ट २०२२ आहे. पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाइन पडताळणी दि. १६ ऑगस्ट ते दि. २१ ऑगस्ट २०२२ करतील. पडताळणी केलेल्या अर्जात दुरुस्ती असल्यास विद्यार्थ्यांनी दुरुस्ती दि. १६ ऑगस्ट ते दि. २२ ऑगस्ट २०२२ (दुपारी २ वाजेपर्यंत) करावी. दुरुस्ती केलेल्या अर्जाची पडताळणी अधिकाऱ्यांनी ऑनलाइन पडताळणी दि. १६ ऑगस्ट ते दि. २२ ऑगस्ट २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) करण्यात येईल. प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाइन भरणे) खुला संवर्ग रुपये २००/ खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग रुपये १००/.
यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरून मान्यता (अप्रुव्ह) घेतला आहे, परंतु प्रवेश घेतलेला नाही, असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्तीमध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले, असे सर्व उमेदवार अर्ज भरू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश प्रक्रियेत अध्यापक विद्यालय मिळाले नाही, अशा विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम बदलून रिक्त जागा असलेल्या अध्यापक विद्यालयांचा पसंतीक्रम द्यावा. अर्ज ऑनलाईन अप्रुव्ह केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. विद्यार्थ्यांने अध्यापक विद्यालयाची स्वतः निवड करून लगेचच प्रवेशपत्र स्वतःच्या ईमेल/लॉगइन मधून प्रिंट घ्यावयाची आहे. त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसांच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे राज्यस्तरीय डी. एल. एड. प्रवेश, निवड, निर्णय व प्रवेश सनियंत्रण समिती अध्यक्ष तथा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालकांनी कळविले आहे.
