ठाणे, दि.17 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाणे जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या शहापूर येथील मुलांचे वसतीगृह, भिवंडी येथील आर्थिक दृष्ट्या मागसवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह या ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले. शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी-विद्यार्थींनींनी या उपक्रमांमध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे व समाज कल्याण अधिकारी गणेश पवार यांच्या निर्देशांनुसार, ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आणि भिवंडी येथील आर्थिक दृष्ट्या मागसवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह या ठिकाणी दि. ११ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत भारतीय स्वातंत्र्य पर्वानिमित्त अनेक कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरे करण्यात आले. यामध्ये वाचन स्पर्धा, अंमली पदार्थ सेवन विरोधी प्रतिज्ञा, वक्तृत्व स्पर्धा, वसतिगृह परिसरातील नागरिकांना राष्ट्रध्वज वाटप, निबंध स्पर्धा, प्रभात फेरी, विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीवर नृत्य, गायन, कवितावाचन, इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते , अशी माहिती वसतिगृहाच्या गृहपालांनी कळविले आहे.
