ठाणे, दि.30 : शारदा एज्येकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविदयालयाच्या विदयार्थ्यांनी वर्तमानपत्र व टिशूचा वापर करुन सूबक अशी इकोफेंडली गणेशमूर्ती साकारली. नैसर्गिक विघटन होणा-या पदार्थांचा वापर करुन निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा संदेश या गणेशोत्सवातून देण्यात आला. आकर्षक आरास करत अप्रतिम असा गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
कला शिक्षक योगेश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थी समितीच्या विदयार्थ्यांनी आनंद विश्व गुरुकुलच्या प्रांगणात गणेशमूर्तीची स्थापना केली. सर्व विदयार्थ्यांनी जल्लोषात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले.
या उत्सवात संस्थेचे अध्यक्ष श्री. विलास ठुसे सर यांनी विदयार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत अशाच नवनवीन उपक्रमांत सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. माध्यमिक व कनिष्ठ महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा हर्डीकर मॅडम यांनी गणेशमूर्तीचे पूजन केले. उपप्राचार्या दिपिका तलाठी मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सर्व विदयार्थ्यांनी गणेशमूर्तीचे दर्शन घेतले. सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
