मुंबई दि.31 ऑगस्ट चित्रलेखा रासने(प्रतिनिधी) : राज्यात पावसानं काही दिवस दडी मारल्यानंतर पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. राज्याच्या विविध भागात श्री गणेशाचं स्वागत जोरदार पावसानं झालं. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबई परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. अहमदनगर, रायगड आणि पालघर जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली. आज देखील मुंबई, ठाण्यासह अहमदनगर जिल्ह्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पाहायला मिळाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यात यलो अलर्ट दिला आहे.
बुधवारी गणपतीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. श्री गणेशाचं स्वागत होत असतानाच विविध ठिकाणी पावसानं हजेरी लावली. काही दिवसांपासून उघडीप दिल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात देखील पावसानं हजेरी लावली. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात पुढील दोन दिवस विविध भागात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यात कोकणातील रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूरसह कोल्हापूर जिल्ह्यांत देखील पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्याच्या औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबादसह नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
