ठाणे, दि. 12 – राज्य शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने दि. 14 ते 16 सप्टेंबर या कालावधीत वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात बॉयलर इंडिया 2022 या प्रदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 14 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वा होणार आहे.
या प्रदर्शन व कार्यशाळेचे स्वागताध्यक्ष कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे आहेत. या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमास केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी उपस्थित राहणार आहेत, असल्याची माहिती संचालनालयाचे संचालक ध.प्र.अंतापूरकर यांनी दिली आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शन, चर्चासत्र व कार्यशाळेत बाष्पकांचा सुरक्षित व कार्यक्षम वापर, बाष्पके क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, या क्षेत्रातील रोजगार संधी आदी विविध विषयांवर तज्ञांचा समावेश असलेली 24 हून अधिक चर्चासत्रे होणार आहेत. तसेच बाष्पके उद्योगाशी संबंधित प्रदर्शनाचा समावेश यामध्ये आहे.
