मुंबई, दि. 15 सप्टेंबर, चित्रलेखा(प्रतिनिधी) : दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या लेव्हर कपनंतर टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याचे त्याने एका पोस्टद्वारे सांगितले आहे.
भविष्यात मी आणखी टेनिस खेळणार आहे. मात्र ग्रँडस्लॅम किंवा दुसऱ्या स्पर्धेत नाही, ही माझी शेवटची स्पर्धा असणार असल्याचं त्याने सांगितले आहे. फेडररने आतापर्यंत 20 ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. तो जगातील महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. यासोबतच त्याने व्हिडीओ मेसेजद्वारे आपल्या चाहत्यांचे आणि खेळाडूंचे आभार मानले आहेत.
या प्रवासात फेडररने त्याचे चाहते आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंचे आभार मानले आहेत. मी 41 वर्षांचा आहे. मी 24 वर्षात 1500 हून अधिक सामने खेळले आहेत. आता माझ्या स्पर्धात्मक कारकिर्दीचा शेवट कधी होईल हे मला ओळखावे लागणार असल्याचं तो म्हणाला आहे.
तसेच प्रत्येक मिनिटाला त्याच्या पाठीशी उभ्या असलेल्या पत्नी मिर्काचे आभार मानले. फायनलपूर्वी तिने मला खूप प्रोत्साहन दिले, त्यावेळी ती 8 महिन्यांची गरोदर असतानाही तिने बरेच सामने पाहिले आणि ती माझ्यासोबत 20 वर्षांहून अधिक काळ असल्याचे त्याने आपल्या पत्नीविषयी लिहिले आहे.
