नवी मुंबई, दि.19:- “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” निमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे कार्यालयाच्यावतीने नवी मुंबई परिसरातील महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दि.15 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित एकदिवशीय कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जातपडताळणी समिती, ठाणे श्री.वासुदेव पाटील यांनी दिली.
दिनांक 17 सप्टेंबर 2022 ते दि.2 ऑक्टोंबर 2022 हा सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने या अनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती , ठाणे कार्यालयाचे वतीने दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता कोकण भवन, नवीमुंबई येथे पहिला मजला बैठक कक्षामध्ये नवी मुंबई शहरातील कनिष्ठ महाविदयालये, तंत्रनिकेतन, वैद्यकिय, नर्सिंग, विधी, आर्किटेक्चर महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे कामकाज पाहणारे तसेच शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणारे कर्मचारी व अधिक्षक यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली होती. या कार्यशाळेस नवी मुंबई भागातील जात प्रमाणपत्र पडताळणीचे कामकाज पहाणारे महाविदयालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सदर कार्यशाळेस उपस्थित महाविदयालयातील कर्मचारी यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीम. वैदेही रानडे व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीम, उज्वला सपकाळे यांनी जात प्रमाणपत्राची पडताळणीची कार्यपध्दती तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील कर्मचारी यांना जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत येत असलेल्या शंकाचे निराकरण करण्यात आले. या कार्यशाळेमुळे अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन मिळाले असून शंकाचे निराकरण झाल्याचे समाधान महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
