नवी दिल्ली, दि. 21 सप्टेंबर, चित्रलेखा(प्रतिनिधी) :
प्रसिद्ध विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांचं वयाच्या 59 व्या वर्षी निधन झालं. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले हाते. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.
गेल्या 42 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. राजू श्रीवास्तव हे स्टॅण्डअप कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी टेलिव्हिजनवर कॉमेडिचा एक नवा पॅटर्न सेट केला. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधील त्यांच्या परफॉर्मन्सचं चांगलंच कौतुक झालं.
10 ऑगस्ट रोजी सकाळी राजू श्रीवास्तव जिममध्ये वर्कआउट करत असताना बेशुद्ध पडले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्या दिवसापासून त्यांना शुद्ध आलीच नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांचे चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत होते. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते, मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर आज राजू श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेतला.
