तुळजापूर, दि. 26. सप्टेंबर (प्रतिनिधी) : महाष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरु झालाय. दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधांमध्ये राहून उत्सव साजरा केला जात होता. उत्सवावर देखील विविध निर्बंध होते. आता सर्व निर्बंध हटवल्यानं उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच्या आधी मध्यरात्री एक वाजता देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा संपवून आपल्या गर्भ घरात दाखल झाल्या. यावेळी आई तुळजाभवानी देवीच्या मूर्तीला पंचामृताचा विधिवत महाभिषेक करण्यात आला. पहाटे चार वाजता आई तुळजा भवानीची मंदिर संस्थांनचे पदाधिकारी आणि मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. नऊ दिवसांच्या निद्रेनंतर आई तुळजाभवानीचे दर्शन झाल्यानं पडत्या पावसात भाविकांनी विधिवत लोटांगण घालून मोठ्या भक्ती भावानं दर्शन घेतलं.
महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील भाविक देखील यावेळी मोठ्या उत्साहात तुळजापूरमध्ये दाखल झालेत. ज्योत घेऊन जाण्यासाठी तरुण भक्तांनीही आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं आल्याचं दिसत आहे. आई तुळजाभवानीच्या मंदिरावर केलेली मनमोहक रोषणाई ही यंदाच्या नवरात्रोत्सवाचं आकर्षण ठरतंय. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण तुळजापूर नगरी सजल्याचं पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे.
तुळजापूरमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळं भाविकांचे चांगलेच हाल झाले. प्रज्वलित केलेल्या भवानी ज्योत छत्रीच्या सहाय्यानं न्याव्या लागल्याचं दिसून आलं. भर पावसात देखील भाविकांचा उत्साह मात्र कायम दिलतोय.
