ठाणे, दि.26 – स्वच्छता ही सेवा या अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा. 2 ऑक्टोंबर, 2022 हा दिवस प्रत्येक गावात स्वच्छता दिवस म्हणून विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. यासाठी या उपक्रमांमध्ये सर्व गावांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सुचनेनुसार ठाणे जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ राबविण्यात येत आहे. गावागावात या अभियानाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेची संकल्पना दृष्यमान स्वच्छता असून त्यानुसार गावांमध्ये दृष्यमान स्वच्छतेसाठी या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत.
ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी, डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गावांच्या दृष्यमान स्वच्छतेची राष्ट्रव्यापी मोहिम राबविण्यासाठी 15 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान मोठ्या जोमाने राबविले जात आहे. तसेच या अभियान काळात बहुतांश गावांतील कचराकुंड्या व असुरक्षित ठिकाणाची साफसफाई, कचरा गोळा करण्यासाठी जागृती करणे, कचरा संकलन करणे, प्लास्टीक गोळा करणे, पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ करणे व त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण करणे, गावसभा आयोजित करणे, हागणदारी मुक्त अधिक घटकांवर परिसंवाद आयोजित करणे व गावात कचरा न करण्यासाठी जाणीव जागृती करणे ग्रामस्थांना स्वच्छतेची शपथ देणे. प्लास्टीक बंदी ठरावाची अंमलबजावणी करणे, आदी उपक्रम राबवले जात आहेत.
