ठाणे, दि.26 :- ज्येष्ठ नागरिकांनो एकटे वाटतंय… भावनिक आधाराची गरज आहे… कायदेशीर आणि निवृत्ती वेतनासंबंधी समस्या आहेत.. तर मग एक कॉल करा 14567 क्रमांकावर.. तुम्हाला सर्वतोपरी मदत मिळेल… होय ही आहे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाची जेष्ठ नागरिकांसाठी ‘एल्डर लाईन’. या क्रमांकावर कॉल केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना भावनिक आधार, योग्य ती मदत मिळण्यास मदत होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या हेल्पलाईनची मदत घ्यावी, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्यासामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने संपूर्ण देशभरात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी व सहाय्यासाठी ‘एल्डर लाईन 14567’ ची सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, राज्य शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि पुण्याची जनसेवा फौउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यात ज्येष्ठ नागरिकांची ही राष्ट्रीय हेल्पलाईन (एल्डरलाईन 14567) जनसेवा फौऊंडेशनतर्फे चालविण्यात येत आहे. यात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी हेल्पलाईन कनेक्ट सेंटर, फिल्ड टीम, विविध शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, विविध ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध स्वयंसेवी संस्था, कायदेविषयक सल्लागार, समुपदेशक, स्वयंसेवक आदींच्या सहभागातून हे काम चालू आहे.
हेल्पलाईनमार्फत माहिती, मार्गदर्शन, भावनिक आधार आणि क्षेत्रीय पातळीवर मदत या चार टप्प्यात काम सुरू असून यात माहिती क्षेत्रात आरोग्य, जागरूकता, निवारा / वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर, ज्येष्ठासंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, कायदेविषयक, अध्यात्मिक, कला, करमणूक इत्यादी मार्गदर्शन तसेच कायदेविषयक आर्थिक, पेन्शन संबंधित, सरकारी योजना, चिंता, निराकरण, नातेसंबंध विषयक व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, जीवन व्यवस्थापन, मृत्यू पूर्वीचे दस्तऐवजीकरण, बेघर, अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची सेवा व काळजी आदी पातळीवर मदत करण्यात येते. एल्डरलाईनचा टोल फ्री क्रमांक 14567 असा असून ही हेल्पलाईन सकाळी 08.00 पासून ते संध्याकाळी 08.00 पर्यंत आठवड्या तील सर्व दिवस कार्यरत आहे. गेल्या वर्षभरात देशातून या हेल्पलाईनवर 9,45,511 एवढे फोन कॉल स्विकारण्यात आले आहेत. यापैकी महाराष्ट्रात 58479 कॉल स्वीकारण्यात आले आहेत.
