
ठाणे, दि. 28 :- नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे उत्पादन होणार नाही, यावर लक्ष ठेवण्याचे तसेच बंद असलेल्या कारखान्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात यावे, अशा सूचना नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी यावेळी दिल्या.
क्षेत्रीय स्तरावर अंमली पदार्थाबाबतची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर पोलीस आयुक्त कार्यालय येथे आज पार पडली. या बैठकीस गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये, पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस. सय्यद, भारतीय तटरक्षक दलाच्या सहायक कमांडन्ट अपूर्वा, मुंबई जकात विभागाचे अधीक्षक शंकर लाल मिना, ठाणे सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कमलाकर जावळे, ठाणे राज्य उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक चारुदत्त हांडे, राज्य उत्पादन शुल्क पनवेल शहराचे निरीक्षक संजय पुरळकर, ठाणे येथील अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक शि.कि. देशमुख, रायगडच्या औषध निरीक्षक भाग्यश्री यादव, ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी ईश्वर चौधरी, कोकण भवन पोस्ट ऑफीसचे सचिन बडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत पोलीस आयुक्तांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कारवाईचा आढावा घेतला. उरण व जेएनपीटी बंदरातून अनेक कंटेनरची वाहतूक होत असते. या ठिकाणी विविध यंत्रणांमार्फत कंटेनर पकडून ताब्यात घेतल्या जातात. या तसेच बंद असलेल्या कंटेनरची माहिती घेण्याबाबत पोलीस आयुक्तांनी भारतीय तटरक्षक दलास निर्देश दिले. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात एमडीचा साठा जप्त करण्यात आला असून नवी मुंबई हद्दीतील रासायनिक व फार्मसी कंपनीमध्ये अंमली पदार्थ बनविले जात आहेत का याची तपासणी करण्याचे निर्देशही पोलीस आयुक्तांनी यावेळी दिले.
पोलीस उपायुक्त मेंगडे यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील दोन विभागात 83 ठिकाणांपैकी 20 ठिकाणी तपासणी करण्यात आली असल्याचे सांगितले. पुढील दोन ते तीन महिन्यात इतर ठिकाणांची तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. अंमली पदार्थ विरोधी समिती सदस्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रत्येक महिन्याला सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

