मुंबई, दि. 3 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशाच्या बॅगेतून एक कोटी 17 लाखांची रोकड आणि 56 लाखांचे दागिने जप्त केले आहेत. ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा रेल्वे स्थानकावर पुष्पक एक्स्प्रेसमधून ही जप्ती करण्यात आली. ही ट्रेन लखनौ ते मुंबई दरम्यान धावते.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे मुंबईतील झवेरी बाजार येथे दुकान आहे. त्याच्याकडे सापडलेल्या रोकड व दागिन्यांची कोणतीही ठोस माहिती तो देऊ शकला नाही. आयकर विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहे.
आरपीएफ जवानांनी ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यावसायिकाकडून एक कोटी 17 लाखांची रोकड आणि 56 लाखांचे दागिने जप्त केले आहेत. जीपी मंडल असे या व्यावसायिकाचे नाव सांगितले जात आहे. जप्त केलेल्या रकमेचे कोणतेही कागदपत्र त्याच्याकडे नव्हते. त्यावर पुढील कारवाईसाठी आरपीएफने त्याच्याकडून जप्त केलेली रोख रक्कम आणि दागिने आयकर विभागाकडे सुपूर्द केले आहेत.
