मुंबई, दि. 4 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : परिवहनमध्ये काम करणाऱ्या एका महिला कंडक्टरने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडीओ अपलोड केला. तिच्या या कृतीवरून राज्य परिवहनच्या अधिकाऱ्यांनी तीला कामावरून निलंबित केले. मात्र, या महिला वाहकाच्या निलंबनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दखल घेत महिला वाहकाच्या पाठीशी उभे राहिले. आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महिलेला पुन्हा सेवेत घेण्याची विनंती केली आहे.
दरम्यान अनेक वरिष्ठ अधिकारी (महिला व पुरुष) संपूर्ण भारत देशातून फेसबुक, ट्वीटर व इतर समाजमाध्यमांचा उपयोग करून स्वतः प्रसिद्धीच्या वर्तुळात राहत असतात. मग ह्या बस कंडक्टरने काय गुन्हा केला. दुसरं काही नाही हा वर्ग संघर्षाचा लढा आहे. तिला कामा वर परत घ्या… असं आव्हाड म्हणाले.
कंडक्टर मंगल सागर गिरी आणि वाहतूक नियंत्रक कल्याण कुम्हार अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तुमच्यावरील आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन तुम्हाला ड्युटीवर ठेवणे महापालिकेसाठी हानिकारक असून, शनिवारपासून तुम्हाला निलंबित करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर संबंधित महिलेच्या निलंबनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे या महिलेवरील निलंबनाच्या कारवाईला अनेकांनी विरोध केला. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिला पाठिंबा देण्यात आला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून हा वर्ग संघर्ष आहे, या महिलेला पुन्हा कामावर घ्या, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता या महिला कंडक्टरचे काय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
