ठाणे, दि. 7 : भिवंडी शहरात रविवार, दि. ०९ ऑक्टो २०२२ रोजी (चंद्र दर्शनानुसार एक दिवस मागे किंवा पुढे) ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमुळे भिवंडी शहरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित रहावी यासाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल केले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी कळविली आहे.
वातुकीत बदल पुढीलप्रमाणे –
प्रवेश बंद – वाडा रोड मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना अंबाडी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची जडअवजड वाहने ही अंबाडी नाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ ने अथवा बृहन्मुंबई महानगरपालिका पाईपलाईने मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – वाडा रोडने नदीनाका मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पारोळ फाटा (नदीनाका) येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग – सदरची हलकी वाहने पारोळ फाटा येथून उजवीकडे वळून खोणीगांव, तळवली फाटा, कांबारोड मार्गे वसई रोड येथून डावीकडे वळण घेवून कारीवली मार्गे अथवा विश्वभारती फाटा येथून डावीकडे वळण घेवून गोरसईगांव मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – वडपा चेकपोस्ट मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना एसटी बसेससह धामणगांव, जांबोळी पाईपलाईन नाका व चाविंद्रा नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग – अ) सदरची सर्व प्रकारची वाहने धामणगांव पाईपलाईन येथे उजवीकडे वळण घेवून पाईपलाईन मार्गे वाड्याकडे व पुढे इच्छित स्थळी जातील. ब) तसेच एस. टी. बसेमधील प्रवासी चाविंद्रा जकात नाका या ठिकाणी उतरवतील व तेथून प्रवाशी घेवून बस वळवून इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – ठाणे, कल्याणकडून जुना ठाणे आग्रा रोडने वाडा बाजूकडे व चाविंद्रा मार्गे नाशिकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना बागेफिरदोस मस्जिद पेट्रोल पंप येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने बागेफिरदोस पेट्रोल पंप येथे उजवीकडे वळण घेवून नागाव रोडने इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – राजनोली चौकातून भिवंडी शहरात येणाऱ्या एस.टी., के.डी.एम.टी. बसेस, जड अवजड वाहने, कार, रिक्षा, दुचाकी, मध्यम व हलकी वाहनांना राजनोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – अ) सदरची एस.टी., के. डी.एम.टी. बसेस, शिक्षा या रांजनोली नाका येथे प्रवाशी उतरवतील व तेथूनच
प्रवाशी भरुन इच्छित स्थळी जातील.
ब) तसेच जड-अवजड, मध्यम व हलकी वाहने राजनोली नाका येथून वळसा घेवून मुंबई-नाशिक बायपास हायवे वरील मानकोली नाका येथून अंजुर फाटा किंवा वसई रोड किंवा ओवळी खिंड येथून ओवळी गाव, ताडाळी जकात नाका कामतघर किंवा पाईपलाईन रोडने इच्छित स्थळी जातील.
नो-पार्किंग झोन – कॉटरगेट मस्जिद-रामभवन हॉल-चाँदतारा मस्जिद, बुबेरे हॉटेल-पटेल मस्जिद उजव्या बाजुने पांजरपील चौक मार्गे उजव्या बाजूस वळून पंडीत जवाहरलाल चौक (वंजारपाटी नाका) ममता हॉस्पिटलच्या बाजूने डावीकडे मामा भांजा दर्गा पावेतो या मिरवणूक मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांना वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात येत आहे.
सदरची वाहतूक अधिसूचना ही ईद-ए-मिलाद या दिवशी दि. ०९ ऑक्टोबर २०२२ रोजी (चंद्र दर्शनानुसार एक दिवस मागे किंवा पुढे) दुपारी १२.०० ते २४.०० वाजेपर्यंत किंवा मिरवणूक संपेपर्यंत अंमलात राहील. सदरची वाहतुक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असेही ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त गणेश गावडे यांनी कळविले आहे.
