ठाणे, दि. 10 ऑक्टोबर :- कोंकण विभाग शिक्षक मतदार संघात 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय तहसीलदार कार्यालये, जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावे, असे आवाहन कोंकण विभाग शिक्षक मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले.

कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदान नोंदणी कार्यक्रमासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शिनगारे बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम जिल्हापरिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले आदी उपस्थित होत्या.
श्री. शिनगारे म्हणाले की, कोंकण विभागाच्या शिक्षक मतदार संघातील मतदार नोंदणीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. त्यानुसार 1 ऑक्टोंबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज नमुना क्र. 19 भरून मतदार नोंदणी करता येणार आहे. दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. तर 30 डिसेंबर 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी फक्त उपविभागीय कार्यालयात मतदार नोंदणी करता येत होती. आता जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालये, तहसीलदार कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय, कोकण भवनमधील सहायक पुरवठा अधिकारी कार्यालय आदी 14 ठिकाणी नाव नोंदणी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत, असे श्री. शिनगारे यांनी सांगितले.
शिक्षक मतदारसंघासाठी मतदार म्हणून जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक पात्र असून 1 नोव्हेंबर 2022 या दिनांकापूर्वी मागील सहा वर्षांपैकी तीन वर्षे माध्यमिक शिक्षक म्हणून काम करणारे, जिल्ह्यात रहिवास असलेले, तसेच मागील तीन वर्षात निवृत्त झालेल्या शिक्षकांना मतदार म्हणून नाव नोंदविता येईल.
जिल्ह्यात मागील निवडणुकीत सुमारे 15 हजार 736 इतकी मतदार नोंदणी झाली होती. यावेळेस आणखी जास्त नाव नोंदणी व्हावी, यासाठी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकां मार्फत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी मतदार नोंदणी साठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी केले आहे.
राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी
कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणी सुरू झाली असून यासंदर्भात आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्ह्यातील राजकिय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. जास्तीत जास्त शिक्षकांनी मतदार नोंदणी करावी, यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. शिनगारे यांनी यावेळी केले.
