मुंबई, दि. 10 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : वर्षाचा सण दिवाळी हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तत्पूर्वी ऐन सणासुदीच्या तोंडावर पुन्हा एकदा सर्व सामान्यांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे. दिवाळीआधी डाळींच्या किंमती वाढल्या आहेत. तूर डाळीचा भाव 4 ते 5 रुपयांनी वाढलाय. त्यासोबत उडीद डाळ आणि खाद्य तेलाच्या किंमतीतही वाढ नोंदवण्यात आलीय.
दरम्यान गेल्या आठ दिवसांमध्ये तूर डाळीच्या किंमतीत चार ते पाच रुपयांची वाढ झाली. सध्या तूर डाळीचा ठोक बाजारातील दर हा 110 रुपये प्रति किलो झाला आहे. तर किरकोळ बाजारात तूर डाळीची किंमत 125 ते 130 रुपये किलो इतकी झाली आहे. उडीद डाळीचा दर हा काही दिवसांपूर्वी शंभराच्या आतमध्ये होता. मात्र ऐन दिवाळीआधी उडीद डाळीचा दर 105 ते 110 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वाढलेल्या दरांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे डाळीच्या पिकांना मोठा फटका बसलाय. डाळीच्या पिकांचं पावसात अतोनात नुकसान झालं. येत्या काळात डाळींचं पिकं घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळींचे दर वाढण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. दुसरीकडे खाद्यतेलाच्या किंमतीही वाढण्याची भीती आहे. खाद्यतेल 3 ते 4 रुपयांनी महागलंय. यात आणखी वाढही होण्याची भीती व्यक्त केली जातेय.
