नवी दिल्ली, दि.10 ऑक्टोबर(प्रतिनिधी) : समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांचे निधन झाले आहे. त्यांनी 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
मुलायम सिंह यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होता. त्यातच ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आले. आयसीयूमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुग्रमाच्या मेदांता
हॉस्पिटच्या आयसीयूमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या टीमद्वारे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती गेल्या आठवडाभरात झपाट्याने खालावली होती. प्रकृती खालावल्याने त्यांचा मुलगा आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील मेदांता रुग्णालयात होते.
त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील सैफई गावात मूर्ति देवी आणि सुघर सिंह यांच्या पोटी झाला. मुलायम सिंह हे समाजवादी पक्षाचे नेते आणि पक्षाचे संस्थापक आहेत. 4 ऑक्टोबर 1992 रोजी त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. राजकीय कारकिर्दीत ते तीनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. पेशाने शिक्षक असलेल्या मुलायमसिंह यादव यांच्यासाठी शिक्षण क्षेत्रानेही राजकीय दरवाजे उघडले होते.
