गंगटोकः 24 डिसेंबर(प्रतिनिधी)
सिक्कीममध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. यात १६ जवान शहीद झाले. तर चार जवान गंभीर जखमी आहेत. उत्तरी सिक्कीम भागातील जेमा येथील वळणावरून वाहन जात असताना ते खोल दरीत कोसळले. जखमी सैनिकांच्या बचावासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला.
दुर्घटनाग्रस्त वाहन हे लष्करातील तीन वाहनांचा भाग होता. जेमाच्या रस्त्याने हे वाहन एका अवघड वळणावरून जात होते. तेथून एक वाहन घसरून दरीत कोसळले. या अपघातानंतर लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले. तर चार जखमी सैनिकांना हॅलीकॉप्टरने बाहेर काढण्यात आले. तीन अधिकारी आणि तेरा सैनिक असे सोळा जण शहीद झाल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले. उत्तरी सिक्कीमधील रस्ता अपघातात भारतीय सैनिकांचे मृत्यू झाल्याने दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबासाठी आमच्या संवेदना असून, जखमी सैनिक लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करत आहे. देशभरातून लोकांना या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे.
