जळगाव : जगभरात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या केळीला पुन्हा एकदा मानाचा दर्जा मिळालाय. गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जळगाव डाक विभागाच्या वतीनं जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून केळीची महती सांगणाऱ्या पोस्टाच्या पाकिटाचे अनावरण करण्यात आले. आता पोस्टाच्या प्रत्येक पाकीटावर केळी पाहायला मिळणार आहे.
विविध देशांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या सन्मानार्थ टपाल पाकिटे जारी केली आहेत. देश-विदेशातील तिकिटं पाहिली तर गांधीजींचं संपूर्ण जीवन चरित्र पाहायला मिळते. टपाल तिकिटांच्या जगात गांधीजी सर्वाधिक दिसणारे भारतीय असल्याचं मानलं जातंय. देशातील सर्वाधिक टपाल तिकिटांवर गांधीजी पाहायला मिळतात. त्याच पार्श्वभूमीवर जळगाव येथील महात्मा गांधी उद्यानात मंगळवारी सकाळी 10 वाजता जागतिक टपाल दिनाच्या औचित्यानं गांधी रिसर्च फाऊंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं ‘डाक टिकटों में महात्मा’ या आकर्षक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये महात्मा गांधींजींवर आधारित तब्बल 120 देशांची टपाल तिकिटे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली.
जळगाव जिल्ह्याची केळीच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात ओळख निर्माण झालीय. जगातील केळी उत्पादनात एकट्या जळगाव जिल्ह्यात तीन टक्के इतका मोठा वाटा आहे. या तिकिट प्रदर्शनाच्या उद्धाटन प्रसंगी जळगावची ओळख सांगणाऱ्या केळीचं चित्र व माहिती असलेल्या पोस्टाच्या पाकिटाचं प्रदर्शन देखील करण्यात आलं. जळगाव जिल्ह्याची ओळख केळीचं आगार अशी आहे.
