ठाणे, दि. 13 : ठाणे शहरातीलआनंदनगर सिग्नल ते हायपरसिटी मॉल, वाघबीळ ब्रिज, घोडबंदर रोड या ठिकाणी दि. 13 ते 16 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याने ठाणेकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविली आहे.
वाहतूकीत बदल पुढील प्रमाणे
प्रवेश बंद – मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणा-या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – अ) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
ब) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड/अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
(जड अवजड वाहने सोडून इतर वाहने ही गर्डर टाकण्याच्या वेळी आनंदनगर सिग्नल कट जवळ डावीकडे वळण घेवून सेवा रस्त्याने पुढे हायपरसिटी मॉल कट जवळ उजवीकडे वळण घेवून मुख्य रस्त्याने इच्छित स्थळी जातील.)
गर्डर टाकण्याच्या वेळा खालील प्रमाणे –
1) दि. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत.
२) दि.१४ऑक्टोबर २०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत.
३) दि.१५ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत.
ही अधिसूचना ही वरील नमूद कालावधी दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सिजन गॅसव इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे उप आयुक्त श्री. कांबळे यांनी कळविले आहे.
