मुंबई, दि. 11 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : ठाण्यातील टेंभीनाका येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाची महाप्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळ्यातील भाषणात सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी मानहानीकारक वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती. तर भास्कर जाधव यांनी भाजप नेते गिरीष महाजन यांची नक्कल केली होती. शिंदे गटाचे बाळा गवस यांनी याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.
या तक्रारीनुसार ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सुषमा अंधारे, विनायक राऊत भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर कलम 153, 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनात ठाकरे गटाच्या महाप्रबोधनयात्रेचा शुभारंभ झाला.
यावेळी सुषमा अंधारे, विनायक राऊत भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांनी भाषणे केले. यावेळी या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक व चिथावणीखोर वक्तव्य करत शिंदे यांची प्रतिमा मलीन केली. याबरोबरच इतर राजकीय नेत्यांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवत हा गुन्हा दाखल केला.
