23 ऑक्टोबर(प्रतिनिधी)
मेलबर्न : टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळविला. शेवटच्या चेंडूपर्यंत थरार रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत भारतीय संघाने देशवासियांना दिवाळीचे विजयी गिफ्ट दिले. विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने जोरदार फटकेबाजी केली. शेवटच्या षटकात भारताला १६ धावांची गरज होती. फिरकी गोलंदाज नवाजने आपल्या षटकात वाइड, नो-बॉल टाकल्याने भारताचा विजय सुकर झाला.
१६० धावांच्या पाठलागासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर केएल राहुल चार धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माही चार धावांत तंबूत परतला. सूर्यकुमार यादवने सुरुवात चांगली केली. परंतु १० चेंडूंत १५ धावा करत तोही बाद झाला. अवघ्या २६ धावांवर भारताचे तीन गडी बाद झाले. तर अक्षर पटेलही धावबाद झाला. त्यामुळे भारतीय संघावर दबाव आला होता.
भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. परंतु विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने जोरदार फलंदाजी केली. बाराव्या षटकात मोहम्मद नवाजवर जोरदार प्रहार केला. त्या षटकात वीस धावा काढल्या. १८ व्या षटकात शाहिन आफ्रिदीची धुलाई झाली. या षटकात १७ धावा काढल्या. विराट कोहलीने दोन चौकार मारले. शेवटच्या दोन षटकांत भारताला विजयासाठी ३१ धावांची आवश्यकता होती. हारिस रउफच्या १९ व्या षटकात कोहलीने दोन षटकार मारलाने भारताने विजयाची वाटचाल केली. या षटकात १५ धावा काढल्या. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १६ धावांची गरज होती. हे षटक मात्र रोमहर्षक राहिले. फिरकी गोलंदाज नवाजने वाइट, नो-बॉल टाकले.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने आठ गडी गमावून १५९ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करताना प्रत्येकी तीन बळी घेतले. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक नाबाद ५२ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी इफ्तिखार अहमदने ३४ चेंडूंत ५१ धावांची खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करताना प्रत्येकी तीन बळी घेतले.
