मुंबई, दि. 31 ऑक्टोबर(प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची आई जीनत हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आमिर खान पाचगणीत कुटुंबियांसोबत दिवाळी जल्लोषात साजरी करताना दिसून आला. दरम्यान जीनत हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर आमिरने लगेचच त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात आणले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आमिरदेखील सध्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात आईसोबत आहे.
आमिरची आई जीनत यांची तब्येत ठीक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे आता त्या अगदी व्यवस्थित असल्याचं स्पष्ट झालं आहे. हॉस्पिटलबाहेर येऊन आमिर आणि त्याच्या परिवारातील सदस्यांनी लोकांना अफवा पसरवू नये यासाठी विनंती केली आहे.
आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण आमिरच्या भूतकाळातील काही स्टेटमेंटमुळे आणि इतर काही गोष्टींमुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात आमिरसोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत होती.
