मुंबई, दि. 31 ऑक्टोबर (प्रतिनिधी : आधी वेदांता नंतर फॉक्सकॉन आणि आता एअरबस टाटा प्रकल्प गुजरातला होणार असल्याने महाराष्ट्रात विरोधकांकडून या प्रकरणी अनेक टीका-टिपण्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता भाजपकडून महाराष्ट्रात गुंतवणूक झालेल्या प्रकल्पाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यामध्ये प्रामुख्याने पुण्यात 500 कोटींचा इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या क्लस्टरची 2000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक वाढवण्याची क्षमता आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही मंजुरी दिली असून रांजणगावातील एमआयडीसी फेज तीन मध्ये 297 एकरमध्ये हा इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभा राहणार आहे. तसेच 400 कोटी रुपयांचा आयएफबी रेफ्रिजरेटर्स लिमिटेड प्रकल्प देखील उभारला जाणार आहे.
मागील 4 महिन्यात महाराष्ट्रात आलेले प्रकल्प :
रायगड जिल्ह्यात सिनारामस् पल्प अँड पेपर प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पासाठी जवळपास २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. तसेच 375 कोटींचा महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड प्रकल्पदेखील याच जिल्ह्यात होणार आहे. तर 758 कोटींचा मेगा पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प होणार आहे.
उपराजधानी नागपूरमध्ये सोलार इंड्रस्ट्रिज इंडिया प्रकल्प हा प्रकल्प उभारण्यात येणार असून नागपूर एकूण 378 कोटींचा प्रकल्प असणार आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातही 662 कोटींचा सनफ्रेश ऍग्रो इंडस्ट्रीज प्रकल्प आणि 779 कोटींचा वरुण बेवरजेस लिमिटेड प्रकल्पदेखील उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, सोलापूरमध्ये 126 कोटींचा विठ्ठल कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड प्रकल्प, सोलापूरमध्ये 650 कोटींचा जेनक्रेस्ट बायो प्रोडक्ट्स प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. भाजपकडून मागील 6 महिन्यांत महाराष्ट्रात गुंतवणूक झालेल्या प्रकल्पाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
