मुंबई, दि. 5 नोव्हेंबर(प्रतिनिधी) : अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नवी मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 29 कोटी रुपयांचे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एफडीएने टीटीसी इंडस्ट्रीअल एरिया, एमआयडीसी तुर्भे येथे 2 नोव्हेंबरला धाड मारून कारवाई केली होती. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे.
या कारवाईत एकूण 2 लाख 62 हजार 643 किलो तसेच 854.84 लिटर अन्नपदार्थांची एकूण किंमत 29.67 कोटी रुपये असून हा माल जप्त करण्यात आला आहे. येथील पेट्यांचे स्वरूप कोल्ड स्टोरेज असून या यात बाहेरील देशातून आयात केलेल्या अन्न पदार्थांचा साठा आढळला.
कोल्ड स्टोरेजमध्ये वेगवेगळ्या पेट्यांमध्ये आयातदारांनी विविध देशांमधून मसाले, ड्राय फ्रुट्स, सिरप्स आदी अन्न पदार्थ साठविल्याचे आढळून आले आहेत. अन्न पदार्थाच्या गोण्या व बॉक्स हे लाकडी प्लॅटफॉर्मवर साठविलेल्या होत्या. सर्व अन्न नमुने अन्न विश्लेषक अन्न चाचणी प्रयोगशाळा, मुंबई येथे विश्लेषणासाठी पाठविले आहेत.
यामुळे अन्न पदार्थाची Nutritional Quality व Shelf Life यावर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साठवलेल्या काही अन्न पदार्थांचा दर्जा निकृष्ट असल्याने व कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे एफडीएचे मत आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या आदेशानुसार झाल्याचे समजते.
