ठाणे, दि. 5 नोव्हेंबर(प्रतिनिधी) : एकेकाळी प्रभु रामचंद्रांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या सुषमा ताई तुम्ही वेळप्रसंगी ठाकरेंसोबत अयोध्येला जाणार का? तसेच प्रभु रामचंद्रांसमोर माथा टेकवणार का? असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते राहुल लोंढे यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना केला आहे.
लोंढे म्हणाले, सध्या उद्धव ठाकरे गटाकडे कोणताही वक्ता, प्रवक्ता शिल्लक राहिलेला नाही. नीलम गोऱ्हे, किशोरी पेडणेकर, विशाखा राऊतसारख्या महिला नेत्या आता कुठेतरी अडगळीत पडल्यात. त्यांना आता कुठेतरी वाव नाही म्हणून सुषमा अंधारेंना ठाकरेंनी पुढं आणलं आहे.
लोंढेंनी सुषमा अंधारेंवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, सुषमा ताई ज्या उत्साहात आणि आवेशात भाषणं करत आहेत. ते पाहता त्यांना प्रश्न विचारायचा आहे की, ताईंनी दोन वर्षापूर्वींची भाषणं काय होती? त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर कोणत्या दर्जामध्ये टीका केली होती? आता तुमचं मतपरिवर्तन झालं का? असंही त्यांनी विचारलं.
राष्ट्रवादीवर टीका करताना ते म्हणाले, सुषमा ताई राष्ट्रवादीच्या फायरब्रॅंड नेत्या होत्या. मात्र राष्ट्रवादी त्यांचा उपयोग करण्यात कमी पडली असेल किंवा उपयोग करून घेतला नसेल. त्यामुळे कुठेतरी आपल्या शब्दांना वाव मिळावा म्हणून सुषमा ताई उद्धव ठाकरे गटात सामील झाल्या आहेत.
जर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तर सुषमा ताई तुम्ही त्यांच्यासोबत अयोध्येला जाणार का? प्रभु रामचंद्रासमोर तुमचा माथा टेकवणार का? जे अपशब्द प्रभु रामचंद्रांसाठी वापरले होते. त्याबद्दल जाहीर माफी मागणार का? नवरात्रीमध्ये उपवास धरणार का? हे जनतेला सांगा, असं देखील लोंढे म्हणाले.
जर अजूनही मतपरिवर्तन झालं नसेल, तर ते सुद्धा जनतेला सांगा. मात्र फक्त राजकारण म्हणून टीका करायची असेल तर आम्हालाही राजकारण म्हणून टीका करणं गरजेचं आहे. आम्ही मर्यादा पुरूषोत्तम रामाच्या हिंदुत्वाला मानणारे आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
