ठाणे, दि. 13 नोव्हेंबर(प्रतिनिधी) : माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत आले असल्याचं दिसत आहे. गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी एका महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
घडलं असं की, रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पीडित महिलेसह अन्य नेते उपस्थित होते. संध्याकाळी नवीन उड्डाणपुलाच्या उद्घाटन समारंभात ही घटना घडल्याचा दावा एका 40 वर्षीय एका महिला सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.
या महिलेचा दावा आहे की, आव्हाड यांनी महिलेला चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत तिला बाजूला होण्यास सांगितलं. त्यानंतर महिलेनं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. यावेळी त्यांनी तिला तक्रार दाखल करण्याचं सुचवलं. या प्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.
ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव हा मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठाणे वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी आव्हाड यांच्यावर प्राणघातक हल्ला आणि भादंविच्या इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित तथ्यांचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी न्यायालयानं आव्हाड यांना 15 हजार रुपयांच्या जामीनावर जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता आढवडाभरातच दुसरा गुन्हा दाखल झाल्यानं जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढताना दिसताहेत.
