मुंबई, दि 6 नोव्हेंबर नोव्हेंबर (प्रतिनिधी) :ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. त्याचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलकाला अत्याचाराच्या आरोपाखाली सिडनी पूर्व येथून अटक करण्यात आली आहे.
रविवारी सकाळी श्रीलंकेचा संघ त्याच्याशिवाय आपल्या देशाला रवाना झाला होता. गुणतिलका तीन आठवड्यांपूर्वी जखमी झाला होता आणि त्याच्या जागी अशीन बंडारा याला स्थान देण्यात आले होते, परंतु व्यवस्थापनाने त्याला घरी पाठवण्याऐवजी संघात ठेवले होते.
गुणतिलका यांच्याविरोधात २९ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांची भेट डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणतिलकावर एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याला सिडनीच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमधील टीम हॉटेलमधून अटक करण्यात आली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान गुणतिलका पहिल्या फेरीत हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे T20 विश्वचषकातून बाहेर पडला होता. मात्र, तो ऑस्ट्रेलियात संघासोबत राहिला. नोव्हेंबर 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून त्याने श्रीलंकेसाठी आठ कसोटी, 47 एकदिवसीय आणि 46 टी-20 सामने खेळले आहेत.
