मुंबई, दि. 6 नोव्हेंबर (प्रतिनिधी) :अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज (6 नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष अशा झालेल्या लढतीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 3 नोव्हेंबरला मतदान पार पडलं, त्याची आज मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. कारण त्यांच्या विरोधात कोणत्याही मुख्य पक्षांनी आपला उमेदवार निवडणुकीत उतरवला नाही.
शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या पोटनिवडणुकीसाठी तीन नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीसाठी सुमारे 31.74 टक्के मतदान झालं. सर्व मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली होती.
पोटनिवडणुकीसाठी नेमके कोण उमेदवार रिंगणात आहेत? पाहूया
- ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)
- मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
- नीना खेडेकर (अपक्ष)
- फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
- मिलिंद कांबळे (अपक्ष)
- राजेश त्रिपाठी (अपक्ष)
