शिर्ड, दि. 6 नोव्हेंबर(प्रतिनिधी) : सध्या देशात जे काही सुरु आहे ते देशासाठीही चांगलं नाही, विशेषतः उत्तर भारतामध्ये, ज्याप्रमाणे बिल्किस बानू प्रकरणातील आरोपींना सोडण्यात आलं, आणि तेथील राज्य सरकार आणि केंद्र सरकारने परवानगी दिली. अशा पद्धतीनं आपण धर्म मध्ये आणून गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम केलं तर समाजात दुफळी माजल्याशिवाय राहणार नाही अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर केली. ते शिर्डीत राष्ट्रवादीच्या दोन दिवसांच्या मंथन शिबिरात बोलत होते.
शिर्डीमध्ये सुरु असलेल्या शिबिरात राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांचे भाषणं झाली. यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राजेश टोपे यांच्यासह अनेक नेत्यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अल्पसंख्यांक विभाग आणि गृहनिर्माण विभागाच्या विविध मुद्यांवर त्यांनी आपलं मत वव्यक्त केलं. त्याबाबत त्यांनी काही ऐतिहासिक संदर्भही यावेळी दिले. यावेळी त्यांनी पहिले बंडखोर संत बसवेश्वर महाराज यांनी लिंगायत समाजाची स्थापना केली. त्यावेळी स्त्रियांचं आरक्षण आणि सामुदायिक विचार करणं आणि त्यातून लोकशाही निर्माण करणं हे पहिल्यांदा कोणी सांगितलं तर ते बसवेश्वरांनी सांगितलं, त्यांचा जन्मही महाराष्ट्राच्या आजूबाजूला झाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले.
अल्पसंख्यांक नावाचा जन्म तो स्वातंत्र्यानंतरचा आहे. देशात काही दिवसांपासून अल्पसंख्यांक म्हटलं की फक्त मुसलमान आणि बहुसंख्य म्हटलं की हिंदू असं समजतो पण तसं नाही, इथे अनेक अल्पसंख्यांक धर्म आहेत, धर्म आहेत, सीख, पारशी, ख्रिश्चन असे अनेक धर्म आहेत. आपण अल्पसंख्यांक मंत्री होतो, त्यावेळी आपल्या हातून अल्पसंख्यांक विभागाचं जे काम झालं असेल ते म्हणजे त्यांच्या जमिनी, त्या जमिनी वक्फ अंतर्गत नोंदणी झालेल्या जमिनी कोणालाही विकता येणार नसल्याचा कायदा करण्यात आला असेही त्यांनी सांगितले.
