मुंबई, दि. 17 नोव्हेंबर(प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा व दिलासादायक निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तब्बल 34 टक्के झाला आहे. याबाबतच अधिकृत पत्र राज्य सरकारकडून महामंडळांना पाठवण्यात आले आहे. दरम्यान याबाबतची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली आहे.
याबाबत शिंदे म्हणाले की, सरकारनं महागाई भत्ता 34 टक्के केला आहे. एसटी कर्मचा-यांचा प्रलंबित सहा टक्के महागाई भत्ता मिळावा म्हणून मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीन वेळा भेट घेतली होती.
मुख्यमंत्र्यांनी महागाई भत्ता देतोय असे आश्वासित करून अतिरीक्त मुख्य सचीव परिवहन आशिषकुमार सिंह यांना फोन करून आदेश दिला होता. यावर परिवहन विभागाने सहा टक्के महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव बनविला होता. आज 34 टक्के महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाने अधीकृत पत्र महामंडळात पाठवलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णायामुळे सर्व एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आता एसटी कर्मचाऱ्यांना राज्यातील इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ताबाबतचा निर्णय गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित होता. राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यास उशीर होत असल्याने एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या. आज अखेर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.
