26 नोव्हेंबर(प्रतिनिधी)
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या 77 व्या वर्षी पुण्यात निधन झालं. जवळपास गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र प्रकृती खालावत गेल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं पार्थिव पुण्याच्या बालगंधर्व रंग मंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर संध्याकाळी 6 वाजता वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे हळ-हळ व्यक्त केली जात आहे. समाज माध्यमांवर कलाकारांनी गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
विक्रम गोखले यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं.
घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला होता. सध्या नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे काम ते करत होते. विक्रम गोखले यांना 2010 मध्ये ‘अलोवी’ या मराठी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. सिनेविश्वात मोठे योगदान दिल्यामुळे त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
