मुंबई, दि. 6 डिसेंबर (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या पुण्यतिथी अर्थात महापरिनिर्वाण दिन आज आहे. या दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महामानवास अभिवादन करण्यात आले. यावेळी मंचावर प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला सर्वोत्तम संविधान प्राप्त झालं. डॉ. आंबेडकर यांचा संदेश देशाच्या हिताचा आहे. बाबासाहेबांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करुया.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली.
दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमत्त भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले आहेत. दादर येथील शिवाजी पार्क जवळच्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत असतात.
मागील दोन वर्ष कोरोनामुळे बाबासाहेबांच्या विचारांना मांडणाऱ्या अनेक अनुयायांना त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येता आलं नाही. मात्र आता कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्यानंतर जगभरातून लाखो अनुयायी दादर परिसरात दाखल झाले आहेत.
