मुंबई, दि. 8 डिसेंबर (प्रतिनिधी) : नुकतीच गुजरात विधानसभा निवडणुक पार पडली असून निवडणुकांचा निकालही हाती आला आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याचं आकडेवारीवरुन दिसून येतंय. गुजरातमध्ये एकट्या भाजपला 50 टक्के मिळाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तसेच गुजरात आणि हिमाचल प्रदेशात निवडुन आलेल्या नवनिर्वाचित आमदारांचं त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जाणार आहे. गुजरातचा विकास भाजपच करु शकतो, हे पुन्हा एकदा जनतेनं दाखवून दिल्याचं ते म्हणाले आहेत. मी जेव्हा गुजरातमध्ये प्रचाराला गेलो तेव्हा तेथील मतदारांचा मूड मला दिसून आला असल्याचं ते म्हणाले आहेत. भाजपने आत्तापर्यंत 157 जागा जिंकल्याचा दावाही त्यांनी यावेळी केलाय.
आम आदमी पक्ष फक्त दिल्लीपुरताच मर्यादित असून आपचे पुरते बारा वाजले आहेत. त्यांना गुजरातच्या जनतेनं नाकारल्याचं त्यांनी म्हटलंय. गुजरातने भाजपच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करत असल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, हिमाचल प्रदेशात आमची एकहाती सत्ता आली नसून हिमाचल प्रदेशात आम्ही आणखी मेहनत करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
