मुंबई, दि. 9 डिसेंबर (प्रतिनिधी) :राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट घोंगावू लागले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हवामान विभागाने याला मंदोस चक्रीवादळ असे नाव दिलेय. या चक्रीवादळाचा फटका दक्षिणेकडील राज्यांना जास्त बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 12, 13, 14 आणि 15 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात, मध्ये प्रदेश आणि गुजरातच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महाराष्ट्रात मुंबई ,पुणे ,ठाणे, रायगड आणि गोव्याच्या किनाऱ्याजवळ वादळ पुन्हा आले आहे. त्याचा प्रभाव पडल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चक्रीवादळ तामिळाडूच्या किनारपट्टीला धडकणार असल्यामुळे 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्र आणि गुजरातलाही फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच पुढील आठवड्याची सुरुवात मुंबईमध्ये हलक्या पावसाच्या हालचालींसह होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने म्हंटले आहे कि, 12 डिसेंबर रोजी मुंबईच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून तापमानातील वाढही कायम राहण्याची शक्यता आहे.
