नागपूर : 11 डिसेंबर(प्रतिनिधी)
आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे. मेंदोस वादळामुळं विदर्भात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. त्यामुळं कार्यक्रमावेळी पाऊस देखील येण्याची शक्यता आहे. अवघ्या काही तासांत पंतप्रधानांच्या हस्ते 55 हजार कोटींचा खर्च असलेला समृद्धी महामार्ग देशाला समर्पित केला जाणार आहे. प्रशासनाकडून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावर पंतप्रधानांच्या आगमन आणि उपस्थितीच्या वेळी या ठिकाणी काही वेळासाठी सर्वांनाच प्रवेश बंद राहणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधान लोकार्पण करणार आहेत. समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन द्रुतगती मार्ग हे देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे.
नागपुरातील नागरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी, नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आणि नागपूर मेट्रो टप्पा II ची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांनीच जुलै 2017 मध्ये पायाभरणी केलेले एम्स नागपूरचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे.
नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी मोदींच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय राष्ट्रीय वन हेल्थ संस्था, नागपूर आणि नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत.
पंतप्रधान सकाळी 9.30 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचतील, तिथे ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. सकाळी सुमारे 10 वाजता, पंतप्रधान फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून प्रवास करतील ,तिथे ते ‘नागपूर मेट्रो टप्पा I’राष्ट्राला समर्पित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान ते ‘नागपूर मेट्रो टप्पा -II’ ची पायाभरणीही करतील. सकाळी 10:45 वाजता पंतप्रधान नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत आणि महामार्गाचा दौरा करतील.
सकाळी 11.15 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते एम्स नागपूरचे लोकार्पण होणार आहे. नागपुरातील एका जाहीर कार्यक्रमात, सकाळी 11:30 वाजता, 1500 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ते राष्ट्रीय वन हेल्थ संस्था (एनआयओ ), नागपूर आणि नागपुरातील नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणीही करतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान, केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीईटी) संस्था, चंद्रपूर’ राष्ट्रार्पण आणि ‘हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र, चंद्रपूर’ चे लोकार्पण करणार आहेत.
