मुंबई : 10 डिसेंबर(प्रतिनिधी)
संपत्तीसाठी मुलानेच टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री वीणा कपूर यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याने निर्घृणपणे हत्या करत
मृतदेह माथेरानच्या जंगलात फेकला. वीणा कपूर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. सचिन कपूर आणि त्याचा साथीदार लालू कुमार मंडल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलाने जुहू भागातील 12 कोटी रुपयांचा फ्लॅट मिळवण्यासाठी आपल्या आईची बेसबॉलच्या बॅटने हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह कार्टनमध्ये पॅक केला आणि मुंबईपासून 90 किलोमीटर लांब माथेरानच्या जंगलात फेकला. दुसरीकडे वीणा यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण घटनेची माहिती टीव्ही अभिनेत्री नीलू कोहली यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली आहे. वीणा कपूर यांनी ‘मेरी भाभी’ या मालिकेत भूमिका केली होती. या मालिकेत नीलू कोहली यांनी त्यांच्यासोबत काम केले होते. नीलू यांनी सांगितले की, वीणा यांनी त्यांच्याबरोबर ‘मेरी भाभी’ या मालिकेत जवळपास 5 वर्षे काम केले. या मालिकेनंतर देखील या दोघींनी आणखी एका मालिकेत एकत्र काम केले होते.
नीलू कोहली यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, वीणाजी तुम्ही यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी डिजर्व्ह करत होता. मी दुःखी आहे. तुमच्यासाठी ही पोस्ट लिहित आहे. काय बोलू? आज माझ्याकडे शब्द नाहीत. आशा करते की एवढ्या वर्षांच्या संघर्षांनंतर अखेर तुम्ही शांततेत आराम करत असाल. जुहू भागातील हा तो बंगला आहे जिथे ही धक्कादायक घटना घडलीहे. एका मुलाने आपल्या 74 वर्षीय आईची बेसबॉलच्या बॅटचा वापर करून हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह माथेरान येथे फेकला. मात्र अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या दुसऱ्या मुलाला याची शंका आली आणि त्याने जुहू पोलिसांना याबाबत अलर्ट केले.
