12 डिसेंबर(प्रतिनिधी)
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात रविवारी रात्री विद्यार्थ्यांची बस उलटली. ही बस 48 जणांना घेऊन लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेनं चालली होती. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून घाट उतरताना ही बस उलटलीय.
या घटनेत दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर सहा विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. संबंधित सर्व विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली आणि आजुबाजुच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
हे विद्यार्थी लोणावळ्यातील एका वॉटर पार्कच्या सहलीसाठी रविवारी आले होते. रविवारी रात्री लक्झरी बस लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेनं जात होती. या बसमधून चेंबूर येथील मयांक कोचिंग क्लासेसचे दहावीच्या वर्गातील एकूण 48 विद्यार्थी प्रवास करत होते.
कोचिंग क्लासचे दोन शिक्षकही बसमध्ये होते. ही बस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून चेंबूरच्या दिशेनं चालली होती. यावेळी घाट उतरताना रात्री आठच्या सुमारास मॅजिक पॉईंटजवळ ही बस डाव्या बाजूला उलटलीय.
या अपघातात जवळपास सर्व विद्यार्थी जखमी झालेत. जखमी विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली व आजुबाजूच्या परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेत. या दुर्दैवी घटनेत एक मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू झालाय. क्रेनच्या मदतीनं अपघातग्रस्त बसला बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे.
