पुणे, दि. 14 डिसेंबर : प्रभू रामचंद्रांनी आपल्या आयुष्यातील वनवास ‘पंचवटीत’ भोगला तर आयुष्यातील खडतर प्रवास संपवून गदिमा पुण्यातल्या ‘पंचवटी’ या बंगल्यात स्थिरावले,गदिमा व विद्याताई या प्रेमळ जोडप्याचा संसार याच पंचवटीने फुलताना पाहिला,’माडगूळ’ सारख्या पर्जन्यछायेतल्या दुष्काळी प्रदेशातून आलेला एक होतकरू तरुण पुढे कथाकार,पटकथाकार,कवी,लेखक, संवादलेखक,गीतकार,अभिनेता, निर्माता,राजकारणी ते महाकवी आधुनिक वाल्मिकी गीतरामायणकार ग.दि.माडगूळकर होतानाचा प्रवास मोठ्या आनंदाने व अभिमानाने पाहिला.मराठी साहित्य व हिंदी,मराठी चित्रपटांना गदिमांनी भरभरून दिले,मराठी माणसानेही गदिमांना भरभरून प्रेम व आदर दिला,आज गदिमांची जन्मशताब्दी उलटून गेल्यावरही गदिमांना मराठी माणूस विसरलेला नाही.गदिमांचे साहित्य हे कालातीत आहे,प्रत्येक पिढीला भावणारे आहे.
याच गदिमांच्या पंचवटीतून गदिमांच्या कौटुंबिक आठवणी आता पुस्तक रूपात मराठी रसिकांच्या भेटीस येत आहेत,गदिमांचे जेष्ठ पुत्र ‘श्रीधर माडगूळकर’ यांच्या पत्नी ‘शीतल माडगूळकर’ यांनी गदिमांच्या आठवणी व श्रीधर यांच्या बरोबरच्या सहजीवनाच्या आठवणी “गदिमांच्या पंचवटीतून” या पुस्तकातून शब्दबद्ध केल्या आहेत.गदिमांचा जीवनप्रवास,आठवणी आपण ‘वाटेवरल्या सावल्या’,’आकाशाशी जडले नाते’,’गदिमांच्या सहवासात’,’अण्णांच्या सहवासात’,’मंतरलेल्या आठवणी’ अश्या अनेक पुस्तकातून वाचल्या असतील मात्र एका सुनेच्या,कुटुंबियांच्या नजरेतून हा महाकवी कसा होता,त्याचे कौटूंबिक जीवन ते अखेरचा प्रवास कसा होता याचा आढावा शीतलताईंनी या पुस्तकात घेतला आहे.लेखिका मुंबईसारख्या चौकोनी कुटूंबातून पुण्यात आलेल्या,एका महाकवीच्या संसारात स्नुषा होण्याचे भाग्य त्यांना लाभले ,माडगूळकर कुटुंबाचा संसार चालवणे यापुरते त्या सिमित न राहता,केवळ गदिमांची स्नुषा म्हणून न मिरवता गदिमांच्या अप्रकाशित कविता,गीते मोठ्या कष्टाने संग्रहित करून पुरिया,वैशाखी,आकाशाशी जडले नाते,समर्पण,नाच रे मोरा या सारख्या काव्य-गीतसंग्रह ,कादंबरी,आत्मचरित्र याचे संकलन व प्रकाशन शीतल ताईंनी स्वतः केले होते.
गदिमा एक मोठा कल्पवृक्ष होते,मोठ्या वृक्षाखाली इतर झाडे वाढत नाहीत असे म्हणतात पण याला अपवाद ठरली ती गदिमांची पुढची पिढी,प्रत्येकाने आपापल्या परीने गदिमांचे नाव चालवले ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला,गदिमांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे गदिमांचे जेष्ठ पुत्र ‘श्रीधर माडगूळकर’,कॉलेज जीवनापासून राजकारणात प्रवेश करणारे,मराठी तरुणांसाठी ‘जिप्सी’ नावाचे प्रथम मासिक काढणारे,इंटरनेट वरचे पहिले मराठी साप्ताहिक काढणारे ते पुण्यात आमदारकीची निवडणूक दोनदा लढवण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकात शब्दबद्ध झाला आहे , पुढे राजकारण सोडून लेखनाकडे वळलेले श्रीधर यांच्या लेखणीतून ‘मंतरलेल्या आठवणी’,’आठी आठी चौसष्ट’,’अजून गदिमा’ या सारखी सुंदर पुस्तके मराठी रसिकांना मिळाली,गदिमांच्या आठवणींवर आधारित ‘गदिमा गाणी आठवणी’ असे अनेक कार्यक्रम श्रीधर यांनी केले.पंचवटीतला गदिमांपासून सुरु होणारा प्रवास ते पुढच्या पिढीपर्यंतची वाटचाल शीतलताईंच्या या पुस्तकातून मराठी रसिकांसमोर येत आहे.
गदिमांच्या आशिर्वादाने पंचवटीत,श्रीधरांच्या सहजीवनात पहिले पाऊल टाकणाऱ्या शीतलताई कोणी मोठ्या लेखिका नाहीत पण आई,आजीने प्रेमाने सांगितलेल्या गोष्टी,आठवणी जितका आनंद देऊन जातात,मनाला भावतात तितकाच आनंद गदिमांच्या पंचवटीतील आठवणींनी मराठी रसिकांना मिळेल यात शंका नाही.”कवी तो होता कसा आननी?” या मराठी,गदिमा रसिकांच्या उत्सुकतेला गदिमांच्या पंचवटीतून या पुस्तकातून नक्कीच समाधान लाभेल यात शंका नाही.
गदिमांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून येत्या १४ डिसेंबर २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड, पुणे येथे सायंकाळी ५ वाजता जेष्ठ नाटककार व समीक्षक ‘सुरेश खरे’ यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ अभिनेते ‘डाॅ. मोहन आगाशे’,प्रसिद्ध चित्रकार ‘साधना बहुळकर’,दिग्दर्शक व अभिनेते ‘प्रवीण तरडे’,युवा ‘गायिका योगिता गोडबोले’ व सर्व गदिमा प्रेमींच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.
“गदिमांच्या पंचवटीतून’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील ‘डिंपल पब्लिकेशन’ यांच्या मार्फत नम्रता अशोक मुळे कुटुंबियांनी केले आहे.१६ रंगीत पाने छायाचित्रांसह आर्ट पेपरवर, ४१४ डेमी पानांचे हे पुस्तक असून,महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे हे पुस्तक प्रकाशनानंतर उपलब्ध असेल,पुस्तकाची छापील किंमत रुपये ६०० आहे.ते सर्व रसिक वाचकांसाठी ५०० रुपये सवलत मूल्यामध्ये सर्वत्र उपलब्ध होईल.
