मुंबई : 14 डिसेंबर(प्रतिनिधी)
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता फक्त 25 रुपये शुल्क मोजावे लागणार लागणार आहेत. यंदापासून दहावी आणि बारावी परीक्षेत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त 50 रुपये आकारले जाणार असल्याचं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलंय. मात्र विद्यार्थी, पालक तसंच शिक्षक संघटना आणि इतर काही संघटनांनी त्याला विरोध दर्शवत राज्य शिक्षण मंडळाकडं शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. त्यावर सकारात्मक विचार करुन आणि विद्यार्थ्यांचा फायदा लक्षात घेऊन हे शुल्क कमी करण्यात आलंय.
दहावी-बारावी बोर्ड परीक्षेत शास्त्र, कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या तसेच खेळाडू, एनसीसी, स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात. निकालाचा टक्का वाढवण्यास हातभार लावत असल्यानं विद्यार्थ्यांसाठी हे गुण महत्त्वाचे असतात. त्यामुळं विद्यार्थी सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी शाळा, शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव दाखल करतात. मात्र सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेण्यासाठी फेब्रुवारी-मार्च परीक्षेपासून प्रति विद्यार्थी 50 रुपये छाननी शुल्क हे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रस्ताव सादर करत असताना चलनाद्वारे किंवा रोख रक्कम भरणा म्हणून विभागीय मंडळ स्तरावर घेण्यात येत होतं.
राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पाहायला मिळला होती. याबाबत वेगवेगळ्या संघटनांकडून निवेदनं प्राप्त झाल्यानंतर त्यांचा विचार करुन आणि विद्यार्थी हीत लक्षात घेऊन सवलतीच्या गुणांसाठी प्रस्ताव सादर करताना, अर्ज करत असताना 50 रुपयांऐवजी आता प्रति विद्यार्थी 25 रुपये छाननी शुल्क म्हणून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयानं स्वीकारावं, अशा प्रकारच्या सूचना राज्य शिक्षण बोर्डाकडून देण्यात आल्यात.
