मुंबई :17 डिसेंबर (प्रतिनिधी)
विशेषतः भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. भायखळा येथील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत हा मोर्चा असेल.
रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. यासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. या मोर्चात समविचारी पक्ष देखील सामील होणार असून मोर्चा महाराष्ट्रप्रेमींचा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.
या महामोर्चात शिवसेनेचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, अरविंद सावंत आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. तर राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील काही नेते उपस्थित असतील. तसेच, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आणि इतर नेते उपस्थित असतील.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या या मोर्चाच्या परवानगीच्या मुद्यावरुन देखील राजकीय वातावरण तापलं होतं मात्र, या मोर्चासाठी परवानगी देण्यात आली. मुंबई पोलिसांकडून मोर्चाला लिखित परवानगी देण्यात आली आहे. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर अटी, शर्टींसह ही परवानगी देण्यात आली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत, मोर्चाला परवानगी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र परवानगी मिळाली नाही तरी आमचा मोर्चा होणारच असा पवित्रा देखील घेतला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिचर्डसन क्रुडास मिल, जे. जे. मार्ग उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, टाइम्स ऑफ इंडिया या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. मध्य मुंबईतून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भायखळा येथून नागपाडा जंक्शनमार्गे मुंबई सेंट्रल येथून पुढे जाता येईल किंवा चिंचपोकळी, सातरस्ता मार्गे आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल या रस्त्याने दक्षिण मुंबईकडे जाता येईल. चार रस्ता, रफी अहमद किडवाई मार्ग, पी डिमेलो मार्गेही दक्षिण मुंबईत जाण्यासाठी मार्ग मोकळा असेल.
आज एकीकडे मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा निघतोय तर दुसरीकडे भाजपच्या वतीनं माफी मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हिंदू देवदेवता, महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्या शिवसेनेच्या विरोधातमुंबईसह राज्याच्या विविध भागांत भाजपकडून हे माफी मांगो आंदोलन केलं जाणार आहे.
