नागपूर, दि.19 डिसेंबर (प्रतिनिधी) : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. विविध महत्वाच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याची तयारी केली आहे, तर त्यांना सडेतोड उत्तर देण्याची तयारी सरकारची असल्यामुळे आजचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनात विशेषत: राष्ट्रपुरुषांच्या अवमानावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांच्या प्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे. नागपुरात पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.
हे मुद्दे गाजण्याची शक्यता ! सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, विकासकामांवरील स्थगिती, राष्ट्रपुरुषांच्या अवमान आदी मुद्दय़ांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीची बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली असून या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
सहा मोर्चे निघणार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सहा मोर्चे निघणार आहेत. त्यामध्ये धनगर समाजाचा मोर्चा, विदर्भ जन आंदोलन समितीचा मोर्चा तसेच आशा गटप्रवर्तकांचा मोर्चा महत्त्वाचा ठरणार आहे.
