पत्नी गौरी महाडिक यांना शासकीय जमीन प्रदान
ठाणे, दि. 26 – भारतीय सैन्य दलातील मेजर शहिद प्रसाद गणेश महाडिक यांच्या वीर पत्नी गौरी प्रसाद महाडिक यांना आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते शहापूर तालुक्यातील मौजे खातिवली येथील सुमारे साडेचार एकर शासकीय जमिन प्रदान करण्यात आली.
भारतीय सैन्यदलातील मेजर प्रसाद गणेश महाडिक यांना अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टर येथे लष्करी कारवाई दरम्यान दि. 30 डिसेंबर 2017 रोजी वीरमरण प्राप्त झाले. कै. महाडिक यांचे कायदेशीर वारस म्हणून त्यांच्या विधवा पत्नी श्रीमती गौरी प्रसाद महाडिक (रा.विरार, ता.वसई, जि.पालघर) यांना जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी महाराष्ट्र शासनाचे धोरणानुसार दि.23 डिसेंबर 2022 रोजी आदेश पारीत करुन शहापूर तालुक्यातील मौजे खातिवली येथील उपलब्ध असलेली सुमारे साडेचार एकर शासकीय जमीन कृषि प्रयोजनासाठी प्रदान केले. आज त्यासंबंधीची आदेश श्रीमती महाडिक यांना सुपूर्द करुन त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यथोचित सन्मान केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार (महसूल) श्री. राजेंद्र चव्हाण, जिल्हा सैनिक अधिकारी श्री. प्राजंळ जाधव यांच्यासह श्रीमती महाडिक यांचे नातेवाईक उपस्थित होते.
