ठाणे, दि ७ जानेवारी प्रतिनिधी (पुनित खांडेकर) : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलिस विभागास ध्वज सुपूर्त केला होता. केंद्र सरकारने हा दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे म्हणून घोषित केला. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात २ जानेवारी ते ८ जानेवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून पोलीस ‘रेझींग डे’ सप्ताह साजरा केला जातो. यानिमित्ताने आनंद विश्व गुरूकुल विद्यालय आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यांना पोलीस खात्याचे विभागीय कामकाज, शस्त्रांची माहीती देण्यात आली.
२४ तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांचे कामकाज कसे चालते याविषयी विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावी यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोलीस ठाण्यांना भेट आयोजित केली आहे , असे सप्ताह विषयी बोलताना ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी सांगितले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांनी मोबाईल चोरी गेल्यावर उपाय व ऑनलाईन फसवणुकीपासून सावधानी कशी बाळगावी याची माहिती दिली.त्याच प्रमाणे वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी वाहतूकीचे नियम पाळले नाही तर त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून त्यावर आकारल्या जाणाऱ्या दंडांची माहिती दिली. तसेच पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांनी शस्त्रांची माहिती देऊन, विभागीय कामकाजाची माहिती दिली. अंमली पदार्थ विभागाचे पोलीस हवालदार अनिल पटेकर यांनी सिंम्बा (श्वान) याची ओळख करून त्या दोघांमधील बंध विद्यार्थ्यांना दाखवून दिले. यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र संचालक शशिकांत कोठेकर, सहाय्यक आकाश ढवळ व आनंद विश्व गुरूकुल विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विदिशा शिंदे व विद्यार्थी आणि शिक्षण पूर्ण केले पदवीधर पत्रकार उपस्थित होते.
