ठाणे, दि. १७ : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालया -च्यावतीने ३३ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोपनिमित्ताने आज ठाण्यातील महिला अबोली रिक्षा, दुचाकी तसेच ठाण्यातील मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कुलची चारचाकी वाहने यांची रॅली काढण्यात आली. रॅलीचे उदघाटन मराठी सिने व मालिकांमधील अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रस्ता सुरक्षेचे महत्व कळावे, यासाठी ही रॅली काढण्यात आली. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके, प्रसाद नलवडे, अशोक खेनट, गणेश पाटील, लेखाधिकारी श्रीमती अपर्णा पाटणे, ठाणे आरटीओ कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
लुइसवाडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय (नविन आरटीओ) येथून रॅलीस सुरुवात झाली.
या रॅलीत सुमारे ५० दुचाकी, ३० अबोली ऑटोरीक्षा, ठाण्यातील मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कुलची २५ चारचाकी वाहने यांनी सहभाग नोंदविला.
रॅली लुईसवाडी येथून नितीन कंपनी- कॅडबरी कंपनी-पोखरण रोड नंबर-१-उपवन तलाव-टिकुजिनी वाडी रोड, मानपाडा- माजीवडा मार्गे पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालय लुईसवाडी येथे येवून सांगता करण्यात आली.
श्रीमती. अश्विनी महांगडे यांनी सर्वांनी रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे पालन करून अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करून महिलांना सुरक्षितपणे प्रवास करण्याची हमी देणाऱ्या आणि त्यासाठी ऑटोरिक्षाचे सारथ्य करणाऱ्या उपस्थित अबोली रिक्षा चालक महिलांचे कौतूक केले. तसेच रस्ता सुरक्षा जनजागृतीबाबत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करून सर्वांना सुरक्षित नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
सहा. प्रादेशिक परिहवन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी रॅलीत सहभागी झालेल्या, दुचाकी चालक, अबोली महिला रिक्षा चालक, मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कुलचे मालक/प्रतिनिधी यांचे आभार व्यक्त करून रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 ची सांगता झाल्याचे जाहीर केले.
