ठाणे दि.21 (जिमाका) : पशुसंवर्धन विभागामार्फत अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (ता. राहता,) येथे दिनांक २४ ते २६ मार्च, २०२३ दरम्यान महापशुधन एक्स्पो – २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पो मध्ये देशातील विविध प्रकार व जातीची आणि अतिशय दुर्मिळ प्रकारची जनावरे पाहण्याची संधी पशुप्रेमींना व पशुपालकांना उपलब्ध होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक व पशुप्रेमींनी या पशुमेळाव्यास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
आधुनिक दुग्ध- तंत्रज्ञान, चारा पिके पध्दती फायदेशीर शेळीपालन, कुक्कुट पालन (मांसल / परसातील / अंडी घालणारी) व पशुसंवर्धनाशी निगडीत व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य व रोजगार निर्मितीच्या संधी तसेच लिंग विनिश्चित रेतमात्रा, भविष्यातील आव्हाने त्यातील सखोल मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. या पशुमेळाव्यास होणारी चर्चासत्रे किफायतशीर पशुपालनाच्या संदर्भात उपयोगी पडणार असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी व उद्योजकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी केले आहे.
