Oplus_16908288
दि. ३० (जिल्हा परिषद, ठाणे) – महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने जिल्ह्यातील गरजू, पात्र महिला व मुलींकरिता वैयक्तिक लाभाच्या योजनांचे प्रभावीपणे कार्यान्वयन सुरू असून, २०२५ मध्येही या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी आपले अर्ज ऑगस्ट २०२५ अखेर जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://zpthaneschemes.com या लिंकवर ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी केले आहे.
प्रमुख वैयक्तिक लाभाच्या योजना पुढीलप्रमाणे:
1. महिलांना साहित्य पुरविणे – घरघंटी / पिको फॉल मशीन / शिलाई मशीन (९०% अनुदान)
2. इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना सायकल वाटप (१००% लाभ)
3. इयत्ता ७ वी ते १२ वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण (१००% लाभ)
4. विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलां-मुलींचा सत्कार (१००% लाभ)
या योजनांसाठी दर अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांमध्ये आधारकार्ड, बँक खाते, उत्पन्नाचा दाखला, शैक्षणिक / प्रशिक्षण प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र (असल्यास), आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे दाखले यांचा समावेश आहे. अर्जाची सुस्पष्ट तपशीलवार यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज पडताळणीचा कालावधी पुढीलप्रमाणे असेल:
• तालुका स्तर तपासणी: १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५
• जिल्हा स्तर तपासणी: १६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२५
अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभता ठेवण्यात आलेली असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास हातभार लावणाऱ्या या योजनांतर्गत हजारो लाभार्थ्यांना नवसंजीवनी मिळण्याची संधी आहे. विशेषतः विधवा, अपंग, परित्यक्ता व निराधार महिलांना तसेच दारिद्र रेषेखालील महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद, ठाणे यांच्या वतीने सर्व पात्र लाभार्थ्यांनी ही सुवर्णसंधी साधावी आणि ऑगस्ट महिन्याअखेर पर्यंत अर्ज दाखल करून लाभ घ्यावा, तसेच स्थानिक ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी, शाळा व महाविद्यालयांनी पात्र लाभार्थ्यांना माहिती पोहोचवून योजनेत सहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहे.
